Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · ऑगस्ट 2026 · ३ मिनिटे

गव्हाचं पीठ, चप्पल आणि एक पदवी

By Manoj Deshmukh
गव्हाचं पीठ, चप्पल आणि एक पदवी

अमेरिकेतल्या ७०% कॉलेज विद्यार्थ्यांना एक गोष्ट माहीत आहे, जी आपल्याकडच्या कित्येक पदवीधरांना अजून कळलेली नाही.

तिथे १८ वर्षं पूर्ण झाली की बहुतेक मुलं आई-वडिलांसोबत राहत नाहीत. शिक्षण चालूच असतं, पण त्याबरोबर कुठे छोट्या हॉटेलात, कुठे पेट्रोल पंपावर, कुठे कॉलेजच्या ग्रंथालयात किंवा कँटीनमध्ये काम करत ते आपला दैनंदिन खर्च भागवतात.

Georgetown University च्या अभ्यासात हा आकडा नोंदवलेला आहे — ७०% विद्यार्थी शिकत असतानाच काम करतात, आणि त्यांतले जवळपास ४०% पदवीचे विद्यार्थी आठवड्याला ३० तासांपेक्षा जास्त काम करतात.

तिथे "कोणतं काम" यापेक्षा "काम करतो का" हा प्रश्न मोठा असतो.

आणि आपल्याकडे?

आमच्या एका मित्राच्या घरी एक काकू स्वयंपाकाला यायच्या.

मित्र स्वयंसेवक, सामाजिक जाणीव असलेला. त्यामुळे तो काकूंच्या मुलाच्या शिक्षणाची आपुलकीने चौकशी करत असे.

समोरच्याच गल्लीत चप्पल शिवणारे काका बसायचे. त्यांचाही मित्राशी चांगला परिचय, आणि त्यांचाही एक मुलगा.

एक दिवस काकू पेढे घेऊन आल्या. मुलगा इंजिनिअरिंग पास झाला.

मित्राने विचारलं, "नोकरीचं काही बघू का?"

काकू पटकन म्हणाल्या, "सांगते लागले की !."

त्याच आठवड्यात चप्पल शिवणाऱ्या काकांनी सांगितलं, "आमचा मुलगा बी.कॉम. झालाय, काहीतरी बघा."

मित्राने एका पेट्रोल पंपावर हिशेब लिहायचं काम त्याला लावून दिलं.

आठवडाभरानंतर चौकशी केली, तर मुलाने काम सोडलं होतं.

कारण काय? "हे काम माझ्या पात्रतेपेक्षा कमी आहे."

दोन-तीन आठवड्यांनी

स्वयंपाक करणाऱ्या काकू पुन्हा पेढे घेऊन आल्या. मुलगा कामाला लागला.

मित्र म्हणाला, "अरे वा! कसं काय जमवलंत?"

काकू म्हणाल्या

"निकाल लागल्या दिवशीच मी त्याला बसवून सांगितलं.

माझ्याकडे पदवी नाही. तुझ्या बाबांकडेही नाही. आम्ही दोघं फार शिकलो नाही.

मला गव्हाचं पीठ मिळालं की मी पोळ्या करू शकते. याच एका कौशल्यावर मी आजवर पैसे मिळवले आहेत. तुझे बाबा रिक्षा चालवतात, त्यांच्या त्या कौशल्यावर घर चालतं.

तू आमच्यापेक्षा जास्त शिकला आहेस. तुझ्याकडे नेमकं कोणतं कौशल्य आहे, ते आम्हाला कळणार नाही.

पण पुढच्या पंधरा दिवसांत तू तुझी सोय करायची. आणि याच घरात राहायचं असेल, तर राहण्याचे आणि खाण्याचे पैसे द्यावे लागतील."

मुलाने ते मनावर घेतलं. पंधरा दिवसांत त्याने काम मिळवलं. मित्र म्हणाला काकू मला का नाही बोललात - काकू म्हणाल्या - साहेब, फुकट मिळालेल्या गोष्टींची जाणीव राहत नाही. आणि जाणीव राहिली नाही की ती गोष्ट आपोआप दुसऱ्याची जबाबदारी होऊन बसते.

खरी गोम इथे आहे

दोन्ही मुलं शिकलेली होती. दोघांनाही काम उपलब्ध होतं.

फरक एकाच वाक्यात होता. एका घरात मुलाला "पुढे काय" हा प्रश्न विचारला गेला, दुसऱ्या घरात तो प्रश्न आई-वडिलांनी स्वतःच्या डोक्यावर घेतला.

पदवी हे कौशल्याचं प्रमाणपत्र आहे असं आपण गृहीत धरतो. पण बाजारात पदवी विकली जात नाही, कौशल्य विकलं जातं. काकूंचं गव्हाचं पीठ आणि पोळी हे समीकरण त्यांना पक्कं माहीत होतं. मुलाचं समीकरण त्याला स्वतःलाच शोधावं लागणार होतं, आणि ते शोधण्याची निकड आईने त्याच्यापर्यंत पोहोचवली.

अमेरिकेतल्या त्या ७०% मुलांचं वेगळेपण त्यांच्या हुशारीत नाही. ते फक्त एका साध्या गोष्टीत आहे तिथे "स्वतःचा खर्च स्वतः" ही चर्चा वयाच्या अठराव्या वर्षी होते. आपल्याकडे ती अठ्ठाविसाव्या वर्षीही टाळली जाते.

आपण मुलांना पदवीपर्यंत पोहोचवतो, पण स्वावलंबनापर्यंत पोहोचवतो का?

तुमच्या घरात ही "पंधरा दिवसांची" चर्चा कधी झाली आहे का? आणि नसेल, तर ती कोणत्या वयात व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं?

First published on Facebook.

Read next