घरातला नळ गळायला लागला की आपण सगळ्यात पहिला फोन कोणाला करतो?
MBA झालेल्या पुतण्याला नाही. IIT वाल्या भाच्याला नाही. आपण प्लंबरला फोन करतो. आणि तो म्हणतो — "काका, उद्या येतो, आता वेळ नाही."
अमेरिकेत काय चालू आहे
अमेरिकेत प्लंबर या कामाचा सरासरी पगार वर्षाला $62,970 आहे (US Bureau of Labor Statistics, May 2024). आणि प्रवेशासाठी आवश्यक शिक्षण? फक्त हायस्कूल. डिग्री नाही, कर्ज नाही, चार वर्षं नाही.
दरवर्षी सरासरी ४४,००० जागा या एकाच क्षेत्रात रिकाम्या होतात — पुढच्या दहा वर्षांचा अंदाज आहे.
म्हणूनच तिथल्या तरुण पिढीला आता "toolbelt generation" म्हणतात. २०२२ ते २०२३ या एका वर्षात व्होकेशनल कोर्सेसच्या कॉलेजमधली प्रवेशसंख्या १६% नी वाढली (National Student Clearinghouse Research Center). जग हळूहळू डिग्रीच्या मागे धावणं थांबवून हाताच्या कामाकडे वळत आहे.
आणि आपल्याकडे?
परवा स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी मला ज्ञानदा गुरुकुल — Dnyanada Institute of Flow Piping Technology (DIFPT), वाघोली (पुणे) इथे जाण्याचा योग आला. २०१० पासून ही संस्था ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलांना प्लंबिंगचं प्रशिक्षण देत आहे.
तिथे जे ऐकलं, ते ऐकून मी काही वेळ नुसता बसून राहिलो:
६० दिवसांचा कोर्स. ३० दिवस गावाजवळच्या केंद्रात थिअरी, ३० दिवस वाघोलीच्या कॅम्पसवर निवासी प्रॅक्टिकल. राहण्याची आणि खाण्याची पूर्ण सोय.
फी जेमतेम ६,००० रुपये. एका मोबाईलच्या निम्म्या किंमतीत.
अट एकच वय १८ वर्षांपेक्षा जास्त.
कोर्स संपल्यावर १००% प्लेसमेंट. उलट परिस्थिती अशी की मागणी जास्त आणि पुरवठा कमी. सुरुवात १५–२० हजार रुपये महिना.
पुढे काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, दुसऱ्यांना रोजगार दिला, आणि आज त्यांची मासिक उलाढाल २ लाखांपर्यंत आहे. काही जण तर कामासाठी परदेशातही गेले आहेत.
आता खरी गोम
इतका कमी कालावधी. माफक शुल्क. राहणं-खाणं मोफत. लगेच नोकरी. परदेशाची शक्यता.
आणि तरीही या संस्थेची सगळ्यात मोठी अडचण कोणती?
मुलं मिळत नाहीत.
हे वाचून थोडा वेळ थांबा. एका बाजूला लाखो रुपये फी भरून, तीन-चार वर्षं घालवून, "प्लेसमेंट सेल" च्या दारात रांग लावणारी मुलं. दुसऱ्या बाजूला ६,००० रुपयांत ६० दिवसांत हातात कौशल्य आणि खिशात पगार देणारी संस्था आणि तिथे जागा रिकाम्या.
का?
कारण आपली अडचण पैशाची नाही, प्रतिष्ठेची आहे.
आपल्या समाजात "माझा मुलगा इंजिनियर आहे" हे वाक्य सहज बोलता येतं. "माझा मुलगा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे" हे वाक्य बोलताना आवाज खाली येतो, मुलगा महिन्याला दोन लाखांची उलाढाल करत असला तरीही.
आपण मुलांना काम शिकवत नाही, आपण त्यांना लेबल मिळवून द्यायला पाठवतो.
एक साधा विचार
डिग्री वाईट नाही. ज्याला संशोधन करायचं आहे, शिकवायचं आहे, मोठ्या सिस्टीम्स बांधायच्या आहेत त्याला डिग्री लागतेच.
पण डिग्रीच्या बाजारात अडकून पडणं आणि कौशल्य मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्या आजूबाजूला असे कितीतरी मुलं-मुली आहेत ज्यांच्यासाठी दुसरा रस्ता जास्त लवकर, जास्त स्वस्त आणि जास्त सन्मानाचा ठरेल, फक्त कोणी त्यांना तो रस्ता दाखवला नाही.
तुमच्या ओळखीत बारावी झालेला, दिशा न सापडलेला, घरच्या परिस्थितीमुळे कॉलेजची फी भरू न शकणारा एखादा तरुण असेल तर हा पर्याय त्याच्यापर्यंत पोहोचवा.
ज्ञानदा गुरुकुल (DIFPT), वाघोली, पुणे संकेतस्थळ: https://dnyanadagurukul.in
संपर्क: +९१ ९४२२३३१८६४
एक फोन कोणाचं आयुष्य बदलू शकतो.
तुम्हाला काय वाटतं — आपल्या समाजात हाताच्या कामाला डिग्रीइतकी प्रतिष्ठा मिळायला अजून किती वर्षं लागतील? आणि ती सुरुवात आपल्या स्वतःच्या घरातून करता येईल का?
© मनोजकुमार देशमुख manojdeshmukh@gmail.com @[61572916982385:2048:अभय मठ]@[100000859020870:2048:Abhay Thite]
ज्ञानदा गुरुकुल (DIFPT), वाघोली, पुणे संकेतस्थळ: https://dnyanadagurukul.in/
© मनोजकुमार देशमुख manojdeshmukh@gmail.com अभय मठAbhay Thite
First published on Facebook.
