मी नांदेडला इंजिनिअरिंगसाठी खोली करून राहत होतो. खोलीखाली दोन टपरीवजा हॉटेलं होती. एक रुपयात कटिंग चहा मिळायचा.
त्या हॉटेलपैकी एका ठिकाणी १२–१३ वर्षांचा मुलगा वेटर म्हणून काम करायचा. एक दिवस लक्षात आलं, त्याचा टी-शर्ट फाटलेला होता.
माझी परिस्थितीही काही श्रीमंतीची नव्हती. पण माझ्याकडे एक जुना, वापरण्यालायक टी-शर्ट होता. दुसऱ्या दिवशी तो धुवून, प्रेस करून आणला. चहा पिऊन झाल्यावर, कुणालाही न कळता, पेपरमध्ये बांधून त्याच्या हातात दिला — आणि निघून गेलो.
त्यानंतर अनेकदा नजरानजर व्हायची. तो हसून पाहायचा. मी चहा प्यायचो आणि निघून जायचो.
एक दिवस मी शेजारच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो. बिल द्यायला काउंटरवर गेलो, तर मालक म्हणाला — “तुमचं बिल दिलं गेलंय.”
मी विचारलं, “कोणी?” तो म्हणाला, “एक पोरगा देऊन गेला.”
मी लगेच मागे धावलो, तो दूर उभा होता ! माझ्या कडे पाहताना त्याच्या नजरेत एक समाधान होत ! मी आवाज दिला तर तो दूर पळून गेला !
तो ज्या हॉटेलमध्ये काम करत होता, तिथं तो मला फुकट चहा देऊ शकत नव्हता. म्हणून माझ्या वर पाळत ठेऊन ज्या दिवशी मी शेजारच्या हॉटेल मध्ये चहा पिला तिथले बिल दिले !
मी त्याला केवळ एक जुना टी-शर्ट दिला होता. पण त्याने मला आयुष्यभरासाठी ग्रॅटिट्यूड (कृतज्ञता) कसा असावा, याची अमूल्य शिकवण भेट दिली होती.
आपण नकळत पणे अनेक गोष्टी गृहीत धरतो ! विचार केल्यावर लक्षात येते की मला माझा ग्रॅटिट्यूड विकसित करायची गरज आहे !
First published on Facebook.
