Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · डिसेंबर 2025 · १ मिनिटे

होमस्कूलिंग & अल्टरनेट स्कूलिंग : पालकांची वाढती उत्सुकता

By Manoj Deshmukh
होमस्कूलिंग & अल्टरनेट स्कूलिंग : पालकांची वाढती उत्सुकता

अलीकडे ३–४ लोकांनी मला खास करून विचारलं — “होमस्कूलिंग कसं चालतं? कसं सुरू करायचं?”

बहुतेकांना उत्सुकता यासाठी होती की माझी मोठी मुलगी दहावी उत्तीर्णही झाली आहे, आणि धाकटीला मी अलीकडे एका अनुभवाधारित शिक्षण केंद्रात आणलं आहे. म्हणूनच मला वाटलं — हा अनुभव थोडा शेअर करावा.

खरं सांगायचं तर हा मार्ग निवडणं सोपं अजिबात नाही. आपलं मूल आपल्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कुठे आहे, कसं आहे — ही तुलना न करण्याचा निर्णय हेच अर्धं युद्ध असतं. आणि त्यातही, हा निर्णय आपण घेतलेला असल्यामुळे — संपूर्ण जबाबदारी आपल्यावरच येते. ही जाणीव सुरुवातीला जड जाते, पण हळूहळू स्वीकाराची ताकद येते.

एका टप्प्यावर एक गोष्ट स्पष्ट समजते — शिकणं ही मानवी नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणी पाठांतर केल्यानं किंवा मार्क पडल्याने ती होत नाही. ती घडते अनुभवांमुळे — खेळातून, शोधातून, चुका करून, परत धैर्यानं उभं राहून.

मुलं शिकतात ते जगून, जगण्याशी जोडून. आणि म्हणूनच माझा विश्वास वाढत चाललाय की — शिकणं तणावरहित, आनंददायी आणि गुंतवणारं असलं की मुलं खरोखर फुलतात.

होमस्कूलिंग किंवा अल्टरनेट स्कूलिंग हा ‘सगळ्यांसाठी योग्य’ मार्ग नाही. पण ज्यांना मुलांचं नैसर्गिक, स्वतंत्र आणि आनंदी वाढणं महत्त्वाचं वाटतं— त्यांनी हा पर्याय कमीतकमी समजून घ्यायलाच हवा.

हा प्रवास मुलांचा जितका आहे, तितकाच तो आपला देखील आहे. पालक म्हणून शिकण्याची, बदलांची, आणि धैर्याची ही एक वेगळीच शाळा आहे.

First published on Facebook.

Read next