दिवाळी जवळ आली की ऑफिसमध्ये, नातेवाईकांकडे ड्रायफ्रूटचा डबा हे हमखास गिफ्ट असते आणि त्यात बदाम नाहीत हे अशक्य
कुणी तुम्हाला दिवाळीला शेंगदाण्याचा डबा गिफ्ट दिल्याचं आठवतंय?
आता तुम्ही म्हणाल, बदाम पौष्टिक, शेंगदाणे साधे. सगळ्यांनाच माहिती आहे.
खरंच? चला, आकडे बघूया. (१०० ग्रॅममागे, USDA डेटा)
प्रोटीन: भाजलेले शेंगदाणे 24.4 g, बदाम 21.2 g
फायबर: बदाम 12.5 g, शेंगदाणे 8.5 g
व्हिटॅमिन E: बदाम 25.6 mg, भाजलेले शेंगदाणे 4.9 mg
कॅल्शियम: बदाम 269 mg, शेंगदाणे 92 mg
मॅग्नेशियम: बदाम 270 mg, शेंगदाणे 168 mg
नियासिन (B3), फोलेट: इथे शेंगदाणे पुढे
म्हणजे प्रामाणिक उत्तर असं: दोन्ही उत्तम अन्न आहेत. बदाम व्हिटॅमिन E, फायबर, कॅल्शियममध्ये पुढे. शेंगदाणा प्रोटीन आणि B-व्हिटॅमिन्समध्ये पुढे.
आता एक काम करा. उद्या किराणा दुकानात दोघांचा किलोभाव विचारा. फरक काही पटींचा आहे. "रुपयामागे प्रोटीन" हा हिशोब लावला, तर आपला साधा शेंगदाणा कुठल्याही "superfood"ला मागे टाकतो.
मग "बदाम म्हणजे पौष्टिक, शेंगदाणा म्हणजे timepass" हा समज आला कुठून?
बदाम आपल्याला नवीन नाहीत. भिजवलेले बदाम, बदामाची खीर, मामरा बदाम. हे सगळं आजीच्या स्वयंपाकघरात होतं. पण "California बदाम" हा शब्द आपल्या बोलण्यात अलीकडे आला.
Almond Board of California ही तिथल्या शेतकऱ्यांची industry body. भारत आज त्यांचं सगळ्यात मोठं export market आहे. 2024-25 मध्ये भारतात 42 कोटी पाउंडपेक्षा जास्त California बदाम आले. दहा वर्षांपूर्वी हा आकडा सुमारे 10 कोटी पाउंड होता. हे board भारतात nutrition research ला sponsor करतं, जाहिराती करतं, influencers वापरतं. 2026 ची त्यांची नवी campaign: "Superfood for a Super You".
यात बेकायदेशीर काही नाही. माल विकणं हे त्यांचं कामच आहे. प्रश्न आपला आहे: आपण तो नॅरेटिव्ह न तपासता स्वीकारतो.
आणि हा खेळ नवा नाही, १०० वर्षाहून अधिक काळ जुना आहे. अश्या अनेक गोष्टी असताही पण त्यातील ३ उल्लेखनीय गोष्टी सांगतो :
१. "Torches of Freedom" (1929)
1920 च्या दशकात अमेरिकेत बायकांनी सिगारेट ओढणं वाईट मानलं जायचं. American Tobacco कंपनीला हे खुपत होतं, कारण अर्धी लोकसंख्या म्हणजे अर्धा नफा हातातून जात होता.
त्यांनी Edward Bernays ला बोलावलं. हा Sigmund Freud चा पुतण्या, ज्याला "father of PR" म्हणतात. त्याला एक गोष्ट माहीत होती: कुणाशी वाद घालून त्याच्या मनात इच्छा निर्माण करता येत नाही.
म्हणून त्याने तंबाखू विकलीच नाही. 1929 च्या New York Easter Parade मध्ये काही तरुणींनी मिरवणुकीत सिगारेट पेटवल्या. त्याला नाव दिलं: "Torches of Freedom", स्वातंत्र्याच्या मशाली. पेपरवाल्यांना आधीच कल्पना दिलेली होती. फोटोग्राफर आधीच जागेवर उभे होते.
लोकांना वाटलं ही बातमी आहे. प्रत्यक्षात ती स्क्रिप्ट होती.
२. "More doctors smoke Camels" (1946)
सिगारेटमुळे घसा खराब होतो, खोकला जात नाही, अशी लोकांना शंका यायला लागली. घाबरलेला ग्राहक कंपनीला परवडत नाही.
मग R.J. Reynolds कंपनीने जाहिरात केली: "More doctors smoke Camels than any other cigarette." हा "survey" कसा केला? मेडिकल conventions मध्ये कंपनीच्या stall वर डॉक्टरांना Camel ची पाकिटं फुकट दिली. बाहेर पडताना विचारलं: "तुमच्या खिशात कोणती सिगारेट आहे?"
आकडा खरा होता. तो आकडा कसा बनवला, हे कोणी सांगितलं नाही. पांढरा कोट हा तंबाखूचा सगळ्यात चांगला salesman होता.
1950 मध्ये दोन मोठ्या अभ्यासांनी सिगारेट आणि lung cancer चा संबंध दाखवला. कंपन्यांनी ते नाकारलं नाही. त्यापेक्षा वाईट केलं. 1969 च्या एका internal memo मध्ये त्यांनी आपली अख्खी strategy एका वाक्यात लिहिली: "Doubt is our product." आमचं उत्पादन सिगारेट नाही, "शंका" आहे.
३. साखर विरुद्ध चरबी (1967)
1960 च्या दशकात काही अभ्यास साखर आणि हृदयरोग यांचा संबंध दाखवू लागले. साखर उद्योगासाठी हा धोका होता.
त्यांनी वाद घातला नाही. Sugar Research Foundation ने Harvard च्या तीन शास्त्रज्ञांना आजच्या हिशोबाने सुमारे 50,000 डॉलर दिले, आणि कोणते studies review करायचे तेही हातात दिले. 1967 मध्ये अमेरिकेतल्या आघाडीच्या medical journal (NEJM) मध्ये review छापून आला: दोष चरबीचा. पैसे कुठून आले, हे त्यात कुठेच लिहिलं नव्हतं.
हे 2016 मध्ये उघड झालं, जेव्हा एका संशोधिकेला जुनी internal कागदपत्रं सापडली. तोपर्यंत जवळपास ५० वर्षं जग "low fat" च्या मागे धावत होतं आणि साखर बिनधास्त खात होतं.
आता आपल्याकडे बघूया.
"शुद्ध तुपाने कोलेस्टेरॉल वाढतं, refined तेल वापरा." "नाश्त्याला cornflakes म्हणजे healthy." "बदाम brain food, शेंगदाणे साधे." यातलं किती आपण स्वतः तपासून मानलं, आणि किती जाहिरातीतल्या पांढऱ्या कोटाकडे बघून?
मी असं अजिबात म्हणत नाही की डॉक्टरांचं किंवा WHO चं ऐकू नका. आजारपणात डॉक्टरच हवेत. आणि वरच्या तिन्ही गोष्टींमध्ये खोटं उघडं कुणी पाडलं? शेवटी संशोधकांनीच.
पण "डॉक्टर म्हणाले", "WHO म्हणाले", "अमेरिकन research सांगतो" एवढं ऐकून डोळे झाकण्याआधी तीन प्रश्न विचारा:
हे नेमकं कोण सांगतंय? एक survey, एक influencer, की अनेक independent studies?
हे मी मानलं तर फायदा कोणाचा? संशोधनाला पैसे कोणी दिले?
आकडे काय सांगतात? मी स्वतः तपासू शकतो का?
आणि हीच चाळणी पारंपारिक ज्ञानालाही लावायची. आजीची प्रत्येक गोष्ट बरोबर असेलच असं नाही. पण ती "जुनी" आहे म्हणून चूक आहे, असंही नाही.
1929 मध्ये पेपरमधला फोटो हे काम करायचा. आज तेच काम Instagram reel आणि algorithm करतं, फक्त हजार पटींनी वेगाने. जो गोष्ट (story) control करतो, तो आपली निवड control करतो. म्हणूनच आज बुद्धी वापरणं ही luxury नाही, ती life skill आहे.
तर यंदा दिवाळीला एक डबा शेंगदाणा-गुळाच्या लाडवांचा पण ठेवा.
तुमच्या घरात असा कोणता "सगळ्यांना माहिती असलेला" समज आहे, जो तुम्ही तपासून पाहिला आणि वेगळाच निघाला? कमेंटमध्ये नक्की लिहा.
First published on Facebook.
