Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · मे 2026 · ४ मिनिटे

IIT, NIT ते टॉप राज्य इंजिनिअरिंग ॲडमिशनचं 'कठोर' गणित!

By Manoj Deshmukh
IIT, NIT ते टॉप राज्य इंजिनिअरिंग ॲडमिशनचं 'कठोर' गणित!

दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांच्या (JEE, MHT-CET) तणावपूर्ण शर्यतीत धावत असतात. प्रत्येकाचे पहिले स्वप्न असते IIT, त्यानंतर BITS किंवा NIT, आणि ते हुकले तर आपल्या राज्यातील टॉप कॉलेजेस म्हणजेच COEP, VJTI, SPIT आणि PICT.

या संस्थांबद्दलचे आकर्षण अगदी योग्य आहे. त्यांचा इतिहास, तिथले उत्तम विद्यार्थी आणि शानदार प्लेसमेंट रेकॉर्ड या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. पण, या शर्यतीत आपली वर्षे, पैसा आणि मानसिक ऊर्जा पणाला लावण्यापूर्वी, विद्यार्थी आणि पालकांनी या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे 'राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे गणित' समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हा लेख तुम्हाला निराश करण्यासाठी नाही, तर वास्तव समजून घेऊन योग्य नियोजन करण्यासाठी आहे.

१. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा: JEE चे '१ टक्क्याचे' वास्तव जेव्हा आपण IITs आणि NITs चा विचार करतो, तेव्हा स्पर्धेची पातळी अफाट असते. अलीकडच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया:

देशभरातून दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी JEE Main ची परीक्षा देतात.

उपलब्ध जागांची स्थिती: 🔹 सर्व २३ IITs: १७,५०० जागा (त्यातल्या 'टॉप / जुन्या' IITs मध्ये फक्त ७,००० ते ८,००० जागा) 🔹 सर्व NITs: २४,००० जागा 🔹 BITS (पिलानी, गोवा, हैदराबाद): ३,५०० जागा

जर एखाद्या विद्यार्थ्याला कोणत्याही कॅटेगरीमधून 'चांगल्या' IIT मध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर गणित असे दिसते: ८,००० जागा / १४,००,००० विद्यार्थी = ०.५७%

जर आपण सर्व IITs, NITs आणि BITS सारख्या प्रीमियम संस्था एकत्र केल्या, तरीही देशभरात सुमारे ४५,००० ते ५०,००० जागा उपलब्ध होतात. ५०,००० जागा / १४,००,००० विद्यार्थी = ३.५%

थोडक्यात सांगायचे तर, राष्ट्रीय स्तरावर परीक्षा देणाऱ्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी ९६% ते ९७% विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश मिळत नाही.

२. राज्य स्तरावरील गणित: COEP, VJTI आणि PICT जेव्हा राष्ट्रीय स्तरावरील दरवाजे बंद होतात, तेव्हा राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे लक्ष MHT-CET आणि राज्यातील टॉप कॉलेजेसकडे वळते. पण तिथेही स्पर्धा काही कमी नसते:

स्पर्धक: MHT-CET (PCM ग्रुप) साठी सध्या दरवर्षी सुमारे ४.५ ते ५ लाख विद्यार्थी बसतात.

राज्यातील टॉप जागा: 🔹 COEP: १,२६० जागा 🔹 VJTI: ५४० जागा 🔹 PICT: ८०० जागा (या तीन टॉप कॉलेजेसच्या सर्व शाखा मिळून अंदाजे २,६०० जागा आहेत.)

जर विद्यार्थ्याला COEP, VJTI किंवा PICT मध्ये 'कोणत्याही' शाखेत प्रवेश मिळवायचा असेल, तर त्याची शक्यता: २,६०० जागा / ५,००,००० विद्यार्थी = ०.५२%

३. 'कॉम्प्युटर सायन्स' (CS) चे मृगजळ आज बहुतांश विद्यार्थी फक्त Computer Science आणि IT च्या मागे धावत आहेत. जेव्हा आपण टॉप कॉलेजेसमध्ये फक्त CS चा विचार करतो, तेव्हा हे वास्तव अधिकच कठोर होते.

COEP मध्ये CS साठी मंजूर जागा: ३००

VJTI मध्ये CS साठी मंजूर जागा: ६० (एकूण जागा: ३६०)

५ लाख विद्यार्थ्यांमधून या दोन टॉप कॉलेजेसमध्ये 'प्युअर CS' मिळण्याची शक्यता फक्त ०.०७% आहे.

थोडक्यात सांगायचे तर, कोणत्याही क्लासमध्ये बसलेल्या दर १०० हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांपैकी ९७ ते ९९ विद्यार्थ्यांना या विशिष्ट कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळणार नाही.

हे 'गणित' समजून घेणे का महत्त्वाचे आहे?

हे आकडे समजून घेणे, हे या 'रॅट रेस'वरील सर्वात मोठे औषध आहे. यामुळे तुमचा दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे ते पहा:

१. स्वतःची योग्यता आणि निकाल यांची सांगड घालू नका जर एखादी परीक्षा ९८% मुलांना नाकारण्यासाठी डिझाईन केली असेल, तर तिथे अपयश येणे म्हणजे विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता किंवा क्षमता कमी असणे नव्हे. हे फक्त एक 'स्टॅटिस्टिकल फिल्टर' आहे. पालकांनो, मुलांचे पर्सेंटाईल (Percentile) त्यांचे भविष्य ठरवू शकत नाही.

२. प्लॅन B (आणि C) चे महत्त्व गणितानुसार शक्यता कमी असल्याने, एक भक्कम 'बॅकअप प्लॅन' असणे म्हणजे 'पराभवाची तयारी' नसून तो कॉमन सेन्स आहे. टॉप ५ कॉलेजेसच्या पलीकडेही अनेक उत्तम टीअर-२ संस्था आहेत, जिथे मेहनत करण्याची तयारी असलेला विद्यार्थी नक्कीच प्रगती करू शकतो.

३. फक्त कॉलेज टॅग (Tag) नव्हे, तर स्किल्सवर (Skills) लक्ष केंद्रित करा IT क्षेत्रातील माझ्या २६+ वर्षांच्या अनुभवातून मी हे सांगू शकतो की, पदवीवरील 'कॉलेजचा टॅग' फक्त तुमच्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यू पुरता महत्त्वाचा असतो. आपण आता Applied AI च्या युगात वेगाने प्रवेश करत आहोत. टीअर-३ कॉलेजचा एखादा विद्यार्थी जर सुट्टीत Generative AI शिकून स्वतःचे प्रोजेक्ट्स बनवत असेल, तर तो टॉप कॉलेजच्या फक्त GPA वर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्याला अगदी सहज मागे टाकेल.

विद्यार्थ्यांसाठी - मन लावून अभ्यास करा. JEE आणि MHT-CET मध्ये तुमचे सर्वोत्तम १००% द्या. या तयारीच्या काळातून मिळणारी अभ्यासाची शिस्त आयुष्यभर पुरेल. पण एखाद्या विशिष्ट कॉलेजच्या मागे लागून स्वतःचे मानसिक आरोग्य पणाला लावू नका.

पालकांसाठी - मुलांना पाठिंबा द्या, त्यांचे मार्गदर्शक आणि भक्कम आधार बना. IIT, NIT किंवा COEP, VJTI हे नक्कीच उत्तम लाँचपॅड आहेत, पण ते आयुष्यातील एकमेव 'सत्य' नाहीत, हे त्यांना समजावून सांगा.

खऱ्या जगात तुम्ही 'काय करू शकता' याला किंमत असते, तुम्ही 'ते कुठून शिकलात' याला नाही! 🚀

First published on Facebook.

Read next