अनिल कुलकर्णी आणि राकेश जैन. दोन भिन्न प्रवृत्ती, पण एकाच मातीत रुजलेली, एकाच वयाची दोन झाडे. शाळेच्या बाकापासून सुरू झालेली ही मैत्री वयाच्या प्रत्येक वळणावर अधिकच घट्ट होत गेली. अनिल स्वभावाने अभ्यासू; तो शिकला, मोठा झाला आणि एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून स्थिरावला. राकेशच्या नशिबी मात्र आयुष्याने वेगळाच पट मांडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्याने परिस्थितीचे चटके सोसत शिक्षण अर्धवट सोडले आणि गावातच पिढीजात व्यवसायाचा गाडा हाकायला सुरुवात केली.
नियतीचा खेळ असा की, दोघांच्याही अंगणात पाळणा एकाच वेळी हलला. अनिलच्या घरात प्रणव आला आणि राकेशच्या घरात राजू.
अनिलरावांनी प्रणवला आपले महत्त्वाकांक्षी 'ध्येय' बनवले. जगातलं सर्वोत्तम तेच माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, हा त्यांचा अट्टहास. प्रणवचे जग केवळ अभ्यास, खासगी शिकवण्या आणि स्पर्धा परीक्षांच्या चौकटीत बंदिस्त झाले. घरच्या साध्या कामांनाही त्याचा स्पर्श होऊ नये, याची अनिलरावांनी डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. दुसरीकडे, राजू मात्र मोकळ्या रानातल्या झाडासारखा वाढला. दुकानात बसणे, गिऱ्हाइकांशी बोलणे, घरातली कामे करणे यात तो अगदी लहानपणापासूनच तरबेज झाला.
प्रणव अनिलरावांच्या स्वप्नांच्या शिड्या वेगाने चढत होता. नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण आणि मग थेट अमेरिकेत नोकरी! डॉलरमध्ये पगार सुरू झाला. घरात परदेशी वस्तू येऊ लागल्या. अनिलरावांच्या मनगटावर आता 'अँपल'चे अत्याधुनिक घड्याळ अभिमानाने चमकू लागले होते. इकडे राजूने तालुक्याला बी.ए. पूर्ण केले आणि तो कायमचा वडिलांच्या व्यवसायात सावलीसारखा उभा राहिला.
सगळं कसं सुतासारखं सरळ चाललं होतं... पण आयुष्यातली वादळं कधीच दार ठोठावून येत नाहीत.
अनिलरावांच्या पत्नीला कर्करोगाने (कॅन्सरने) गाठले आणि तोही थेट शेवटच्या टप्प्यात. पैशांची उब आणि अमेरिकेतील मुलाची 'प्रतिष्ठा' या आजारापुढे थिटी पडली. अनिलरावांनी थरथरत्या हातांनी प्रणवला फोन लावला.
"बाबा, माझा व्हिसा अद्याप प्रक्रियेत अडकला आहे. मी आता तो देश सोडला, तर माझी इथली नोकरी, माझी कारकीर्द सगळंच संपेल. मी हतबल आहे बाबा..." प्रणवचा कोरडा आवाज मोबाईलच्या पडद्यापलीकडून येत होता.
अनिलराव हतबल झाले होते... पण अशा वेळी ज्याला कधीच 'हुशार' मानले नाही, तो राजू धावून आला. त्याने स्वतःचा व्यवसाय वाऱ्यावर सोडला आणि तो अनिलरावांच्या पाठीशी एखाद्या खंबीर स्तंभासारखा उभा राहिला. रुग्णालयाच्या चकरा, डॉक्टरांच्या तारखा, आणि काकूंची रात्रंदिवस सेवा... राजूने सख्ख्या मुलालाही लाजवेल अशी काळजी घेतली.
पण काळापुढे कोणाचे चालते? अनिलरावांच्या पत्नीने अखेरचा श्वास घेतला.
प्रणव पुन्हा व्हिडिओ कॉल वर रडला. व्हिसाच्या एका कागदाने एका मुलाला त्याच्या आईच्या अंत्यदर्शनापासून रोखले होते. अनिलरावांच्या डोळ्यांत आता अश्रूही उरले नव्हते. स्मशानभूमीत जेव्हा राजूने पुढाकार घेऊन सर्व अंत्यसंस्कार पार पाडले, तेव्हा चितेच्या ज्वाळांमध्ये अनिलरावांना आपल्या अतिमहत्त्वाकांक्षी स्वप्नांची राख होताना दिसत होती.
...या गोष्टीला आता बरीच वर्षे लोटली.
एकदाचा प्रणवचा व्हिसा मंजूर झाला आणि तो भारतात परतला. पण तो येताना फक्त एक आठवड्याची सुट्टी आणि एक नवीन निर्णय घेऊन आला होता. अमेरिकेत सोबत काम करणाऱ्या एका मुलीशी त्याने लग्न ठरवले होते. घरात सुतकी शांतता असतानाच, अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे निव्वळ 'व्यावहारिक' लग्न उरकले गेले आणि आठवड्याभरातच प्रणव पत्नीला घेऊन पुन्हा आपल्या अमेरिकेच्या दुनियेत निघून गेला. काही महिन्यांनी जेव्हा अनिलरावांनी नातवंडांचा विषय काढला, तेव्हा प्रणवने स्पष्ट केले, "बाबा, आम्हाला मुले नको आहेत. आम्हाला आमचे स्वातंत्र्य आणि खासगी आयुष्य जपायचे आहे." आता त्यांच्या घरात एका पाळीव कुत्र्याने जागा घेतली होती.
आज अनिलरावांचा प्रशस्त बंगला बाहेरून जेवढा आलिशान दिसतो, आतून तेवढाच तो भयाण रिकामा आहे. घरातली चकचकीत परदेशी संगमरवरी फरशी पायांना सतत एक प्रकारचा गारवा देते. दिवाणखान्याच्या मध्यभागी लावलेल्या त्यांच्या पत्नीच्या फोटोवरील फुलांचा हार आता सुकून गेला आहे.
राकेशची सून—म्हणजेच राजूची बायको—ही साक्षात अन्नपूर्णा. तिच्या हाताला विलक्षण चव आहे. रविवारी सकाळी कधी वाफाळलेले कांदेपोहे, तर कधी सणावाराला पुरणपोळी किंवा अळूवडीचा डबा घेऊन राकेशची बायको (अनिलरावांची वहिनी) हक्काने अनिलरावांच्या दारात उभी राहते.
"अनिलभाऊ, सूनबाईने आज खास तुमच्या आवडीचं केलंय. गरम असतानाच खाऊन घ्या बरं!" असं म्हणत ती डबा त्या चकचकीत पण रिकाम्या जेवणाच्या मेजावर ठेवते. त्या वाफाळलेल्या, साजूक तुपाची धार असलेल्या अन्नाचा सुगंध त्या भकास घरात क्षणभर घरपणाची उब निर्माण करून जातो. वहिनी दोन शब्द बोलते, राजूच्या लहानग्या मुलीच्या गमतीजमती सांगते आणि घर परत एकदा जिवंत झाल्यासारखं वाटतं.
पण वहिनी गेली की पुन्हा तीच जीवघेणी शांतता.....
भिंतीपलीकडून, राकेशच्या घरातून राजूच्या चिमुकल्या मुलीचा, तिच्या बोबड्या बोलांचा आणि राकेशच्या खळखळून हसण्याचा आवाज येत राहतो. तो जिवंतपणा त्या भिंतीपलीकडे ओसंडून वाहत असतो.
अनिलराव मेजावरील त्या वाफाळलेल्या डब्याकडे पाहत मखमली खुर्चीत एकटेच बसलेले असतात. अचानक त्यांच्या मनगटावरील ते अत्याधुनिक घड्याळ एका यांत्रिक आवाजात वाजू लागते.
संध्याकाळचे सात वाजलेत. प्रणवच्या ठरलेल्या 'व्हिडिओ कॉल'ची वेळ झाली आहे.
घड्याळ टिक-टिक करत राहते... आणि भिंतीपलीकडून येणारा एका लहान मुलीचा खळखळता हशा त्या शांत घरात घुमत राहतो.
© मनोज देशमुख manojdeshmukh@gmail.com
First published on Facebook.
