अगदी परवा पर्यंत काय चित्र होतं?
४ थी–५ वीच्या मुलांना “कोडिंग क्लास” लावायचे. कुठलातरी लो-कोड / नो-कोड प्लॅटफॉर्म उघडायचा. टेम्पलेट वापरून एक अॅप तयार करायचं. आई-बाबांना दाखवायचं — “पाहा, तुमचा मुलगा स्टार्टअप फाउंडर!”
आई-बाबा खुश. मुलं खुश. क्लासवाले खुश.
पण हे सगळं काय होतं?
हे म्हणजे फोडणी कशी करायची माहिती नाही… आणि रेडी-टू-कूक पॅक वापरून भाजी केली, आणि स्वतःला शेफ समजलं — तसं.
⸻
प्रोग्रामिंग म्हणजे बटण दाबणं नाही
प्रोग्रामिंग हे मूळ क्षमतेचं प्रगटीकरण आहे. ते “स्क्रीनवर काहीतरी बनवलं” इतक्यावर संपत नाही.
त्यामागे लागते — • विचार करण्याची सवय • समस्या ओळखण्याची नजर • चुका मान्य करून सुधारण्याची ताकद • आणि संयम
ही पायाभूत क्षमता नसताना वरून कोडिंग शिकवणं म्हणजे पाया न टाकता इमारत उभी करण्यासारखं.
AI ने दुकानं बंद केली — पण धडा अजून बाकी आहे
आज AI आले. जे अॅप काल मुलं बनवत होती, ते आज AI दोन मिनिटांत बनवतो.
मग प्रश्न उरतो — जर AI सगळं तयार करून देणार असेल, तर मुलांनी काय शिकावं?
उत्तर साधं आहे — प्रॉब्लेम सोलविंग.
खऱ्या आयुष्यातील प्रयोग
मुलांना स्क्रीनवरचे बनावट प्रोजेक्ट देण्यापेक्षा हे करून बघा:
👉 आजच्या रात्रीच्या जेवणाचं पूर्ण नियोजन तुझं. • बाहेरून काही मागवायचं नाही. • घरात जे आहे त्यातून मेनू ठरवायचा. • फक्त एकाची मदत घ्यायची.
हा एक प्रचंड शिकण्याचा अनुभव आहे!
त्यात काय शिकेल? • संसाधन व्यवस्थापन • वेळेचं नियोजन • संवाद • निर्णयक्षमता • आणि जबाबदारी
घर म्हणजे सर्वात मोठी लॅब • ट्रिप प्लॅन करायला द्या • महिन्याचा छोटा बजेट सांभाळायला द्या • घरातील एखादी प्रक्रिया सुधारायला सांगा • एखादी खरी समस्या शोधून उपाय सुचवायला लावा
ही “लाईव्ह प्रोजेक्ट्स” आहेत. यासाठी कोणत्याही कोडिंग क्लासची गरज नाही.
पुढचं जग कसं असेल?
AI मुळे कॉग्निटिव्ह स्किल्स सहज उपलब्ध होतील. माहिती, कोड, डिझाइन — सगळं हाताच्या बोटावर येईल.
पण महत्वाचं काय उरेल?
✔️ योग्य समस्या शोधण्याची नजर ✔️ लोकांसोबत काम करण्याची क्षमता ✔️ जबाबदारी घेण्याची तयारी ✔️ अपयश पचवण्याची ताकद
AI टूल आहे. मेंदू आणि स्वभाव — हेच खरं भांडवल आहे.
आज मुलांना “अॅप बनवायला” शिकवू नका. त्यांना विचार करायला शिकवा.
बाकीचं AI करून देईल.
