Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · ऑक्टोबर 2026 · ३ मिनिटे

ज्याच्याशी मोकळेपणाने बोलता येईल, असा एक ‘सांगाती’

By Manoj Deshmukh
ज्याच्याशी मोकळेपणाने बोलता येईल, असा एक ‘सांगाती’

सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या ‘सांगाती’ उपक्रमात पुण्यातील सेवा वस्त्यांमधील इयत्ता 8 वी ते 10 वीची निवडक मुले सहभागी होतात. प्रत्येक मुलाला एक समुपदेशक जोडून दिला जातो, साधारण २-३ मुलांमागे एक ताई किंवा दादा. मुलांसोबत काम करण्याची मनापासून आवड असणारे समाजातील ताई-दादा.

हे ताई-दादा मुलांच्या घरी भेट देतात. आठवड्यातून एक-दोनदा फोनवर गप्पा होतात. वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे घेतली जातात. शाळेची फी भरणे, वह्या-पुस्तके अशी थोडीफार मदतही केली जाते.

पण या उपक्रमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जोडणी. एक असा माणूस, ज्याच्याशी मूल अगदी मोकळेपणाने बोलू शकते. दहावी संपेपर्यंत हे ताई-दादा त्या मुलाच्या कुटुंबाचाच एक भाग बनून जातात.

कालचं सत्र: मार्कांच्या पलीकडचं शिक्षण

काल या मुलांच्या पालकांसाठी मी ‘जीवनकौशल्ये’ (Life Skills) या विषयावर एक सत्र घेतले. साधारण 40 पालक उपस्थित होते. दिवसभराचं काम आटोपून इतके पालक आपल्या मुलांसाठी आले, हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट होती.

सत्राचा मूळ प्रश्न साधा होता: केवळ परीक्षेतले मार्क आज पुरेसे आहेत का? मार्क पाठांतर दाखवतात, पण मूल लोकांशी कसं बोलतं, पैशाचा हिशेब कसा ठेवतं, अपयशातून कसं उभं राहतं , हे कुठलीच गुणपत्रिका सांगत नाही. मार्क म्हणजे दाराची चावी; जीवनकौशल्ये म्हणजे आत गेल्यावर टिकण्याची ताकद.

मी पाच मूलभूत कौशल्यांवर बोललो :

१. स्पष्ट संवाद

२. समस्या सोडवणे

३. सांघिक काम (टीम वर्क )

४. भावनिक समतोल आणि

५. नव्या परिस्थितीत जुळवून घेणे.

त्याचबरोबर पैशाचं व्यवहारज्ञान आणि घरकामातून घडणारी जबाबदारीही चर्चेत आली. यातलं एकही कौशल्य पुस्तकातून पूर्ण शिकता येत नाही; ते घरात आणि रोजच्या आयुष्यात शिकलं जातं.

पालकांनी मांडलेली खरी काळजी: ‘आमचं नाही, AI चं ऐकतात’

चर्चेत एक मुद्दा वारंवार समोर आला तो म्हणजे अगदी साध्या-साध्या गोष्टींसाठी मुलं आता AI वापरतात. आई-बाबांनी सांगितलेली गोष्ट न ऐकता ती Gemini किंवा ChatGPT ला विचारतात, आणि त्यांच्याच उत्तरावर विश्वास ठेवतात.

दुसरी काळजी अधिक गंभीर होती: शाळेतून दिलेला जवळजवळ सगळा गृहपाठ आता AI च्या मदतीने केला जातो. वहीत उत्तर नीटनेटके दिसतं, पण ते उत्तर मुलाला समजलं आहे का, हे कुणालाच माहीत नसतं.

यात दोष फक्त मुलांचा नाही. हातात इतकं सोपं साधन आलंय, ते कसं वापरायचं हे कुणी शिकवलंच नाही. पण धोका स्पष्ट आहे. जे काम स्वतः करताना मेंदू विचार करायला शिकतो, तेच काम मशीनला दिलं तर विचार करण्याची सवयच मगे पडते.

पालक म्हणून आपण काय करू शकतो?

सत्रात आम्ही काही सोपे उपाय ठरवले. यातल्या एकालाही पैसा लागत नाही — फक्त वेळ आणि लक्ष लागतं.

१. आधी स्वतः, मग AI. गृहपाठ आधी स्वतः करायचा. अडलं तर AI ला उत्तर नाही, तर ‘समजावून सांग’ असं विचारायचं.

२. ‘मला समजावून सांग’. मुलाने लिहिलेलं उत्तर त्याला तोंडी सांगायला लावा. पालक शिकलेले असोत किंवा नसोत, हा प्रश्न कुणीही विचारू शकतो.

३. रोज 15 मिनिटं मोकळ्या गप्पा. फोन बाजूला ठेवून, ‘आज काय नवीन शिकलास?’ असं विचारा. आई-बाबा ऐकून घेतात, असा विश्वास असला तर मूल आई-बाबांचंही ऐकतं.

४. घरकामात सहभाग. स्वयंपाक, साफसफाई, किराणा, हिशेब — मुलगा आणि मुलगी दोघांनाही. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील अभ्यासांमध्ये घरकामात मदत करणारी मुलं अभ्यास, स्मरणशक्ती आणि स्वतःवरच्या नियंत्रणात पुढे असलेली दिसली.

५. पैशाचा हिशेब सोबत. महिन्याचा घरखर्च मुलांसोबत लिहा. ‘गरज की इच्छा?’ हा प्रश्न खरेदीआधी विचारायची सवय लावा.

६. मोबाइलचे घरगुती नियम. फोन काढून घेण्यापेक्षा वेळ आणि जागा ठरवा. रात्री फोन खोलीबाहेर; OTP, PIN कधीही कुणालाही सांगायचा नाही.

७. तुलना नको. शेजारच्या मुलाचे मार्क दाखवण्यापेक्षा ‘काय अडचण आली?’ हे विचारा.

शाळा, सांगाती आणि घर तिघे मिळून

शाळा विषय शिकवेल आणि मार्क देईल. सांगातीचे ताई-दादा मार्गदर्शन करतील, सोबत राहतील. पण आयुष्याची खरी शाळा घरच आहे. मुलं आपण जे सांगतो त्यापेक्षा आपण जसे वागतो, ते पाहून शिकतात.

कालच्या सत्रातून मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली: आपल्या वस्तीतल्या पालकांकडे कष्ट, चिकाटी आणि व्यवहारज्ञान आधीपासूनच आहे. तीच शिदोरी मुलांना दिली, आणि त्याला AI चा शहाणपणाने वापर करण्याची जोड दिली, तर ही मुलं कुठेही मागे राहणार नाहीत.

मार्क दार उघडतात; कौशल्यं आयुष्य घडवतात.

First published on Facebook.

Read next