गेल्या २०-२५ वर्षांत भारतात एक मोठा बदल झालाय. लोअर मिडल क्लासमधून अप्पर मिडल क्लासमध्ये जाण्याचा अनेकांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. १९९० नंतरची 'ओपन इकॉनॉमी', सॉफ्टवेअर (IT) इंडस्ट्रीची वाढ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नव्या संधींमुळे अनेकांचे राहणीमान उंचावले.
पण या समृद्धीच्या प्रवासात पालकांचा एक नवा वर्ग तयार झाला आहे. त्यांचा एकच प्रामाणिक उद्देश असतो: "जे बालपण, ज्या सुखसोयी मला मिळाल्या नाहीत, त्या माझ्या मुलांना मिळाल्याच पाहिजेत!"
भावना अगदी योग्य आणि निखळ आहे. पण यातून नकळतपणे सुरू होतं 'Mollycoddling' (अति-संरक्षण आणि अति-लाड). मुलांची प्रत्येक मागणी पूर्ण करणं, त्यांना कोणतीही जबाबदारी न देणं, त्यांच्या वयानुसार त्यांना मॅच्युअर होऊ न देता सतत 'लहान मूल' असल्यासारखंच वागवणं. त्यात जर घरात एकच अपत्य असेल, तर मग या अति-काळजीचा आलेख थेट गगनाला भिडतो.
ही परिस्थिती समजून घेण्यासाठी मला एका कथेची आठवण येते:
🌱 दोन झाडांची गोष्ट... एकाच सोसायटीत शेजारी-शेजारी एक श्रीमंत तरुण आणि एक वयोवृद्ध आजोबा राहत होते. दोघांनीही आपापल्या घरासमोर लावण्यासाठी एक-एक उत्तम रोप विकत आणलं.
तरुणाने आपल्या रोपाची 'जीव की प्राण' अशी काळजी घेतली. वेळेवर भरपूर पाणी, महागडी खते, आणि रोपाला वाकू नये म्हणून बाजूने काठ्यांचा भक्कम आधार! परिणामी, त्याचं झाड अगदी जोमात, वेगाने आणि उंच वाढलं.
दुसरीकडे, आजोबा मात्र रोपाला फक्त गरजेपुरतंच पाणी द्यायचे. त्यामुळे त्यांचं झाड तरुणाच्या झाडाएवढं उंच आणि डौलदार दिसत नव्हतं, ते थोडं बुटकंच राहिलं.
⛈️ मग एक दिवस वादळ आलं... एके रात्री अचानक मोठा वादळी पाऊस आला. वाऱ्याचा वेग प्रचंड होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतात तर... तरुणाचं ते उंच आणि डौलदार झाड मुळासकट कोलमडून जमिनीवर पडलं होतं! पण आजोबांचं ते बुटकं झाड मात्र त्या भयंकर वादळातही खंबीरपणे उभं होतं.
तरुणाला मोठा धक्का बसला. त्याने आजोबांना विचारलं, *"काका, मी तर माझ्या झाडाची तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काळजी घेतली होती. त्याला सगळं वेळेवर दिलं, तरी माझं झाड का पडलं?"*
आजोबा हसून म्हणाले, "बाळा, तू तुझ्या रोपाला सगळं काही 'आयतं' दिलंस. त्याला कशाचीच कमतरता भासू दिली नाहीस. पाणी आणि खत वरच्या वर सहज मिळत गेल्यामुळे त्या झाडाच्या मुळांना पाण्याची शोध घेण्यासाठी जमिनीत खोलवर जाण्याची गरजच वाटली नाही. मी माझ्या झाडाला फक्त गरजेपुरतंच दिलं, त्यामुळे पाण्यासाठी आणि जगण्यासाठी त्याच्या मुळांनी जमिनीत खोलवर शिरून स्वतःचा मार्ग स्वतः शोधला. म्हणूनच ते या वादळातही टिकून राहिलं!"
--- 'Mollycoddling' च्या नादात आपण त्यांना सगळं काही सहज उपलब्ध करून देतोय. त्यांना छोट्या-छोट्या संकटांचा सामना करू देत नाही, त्यांचा संघर्ष आपणच आपल्या अंगावर घेतो, त्यांना अपयश पचवू देत नाही. परिणामी, जेव्हा खऱ्या आयुष्यातलं एखादं मोठं 'वादळ' येतं, तेव्हा ही मुलं कोलमडून पडतात. कारण त्यांची 'पाळंमुळं' खोलवर रुजलेलीच नसतात.
मुलांवर नक्की प्रेम करा, त्यांना सुविधा द्या, पण त्यासोबतच त्यांना आयुष्यात संघर्ष करायला आणि स्वतःची पाळंमुळं घट्ट रोवायलाही शिकवा. त्यांना 'Strong' बनू द्या! 🌳
तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आजकालच्या पालकत्वाबद्दल तुमचे विचार नक्की सांगा. 👇
© मनोज देशमुख - manojdeshmukh@gmail.com
First published on Facebook.
