Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

कळ्या...

By Manoj Deshmukh
कळ्या...

जपल्या होत्या ओंजळीत काही कळ्या, परसातील वेलीवरच्या... तुला देण्यासाठी! दंवाचे मोती माळून, लेवून अंगभर वसने, सोनेरी किरणांत नहाऊन सजल्या होत्या कळ्या. पाकळ्या-पाकळ्यांत भरून गडद रंग, आणि अंतरात साठवून सुगंधाचा गंध... उत्सुकतेने त्या कळ्यांची फुले झाली! आज भरली ओंजळ, पण रिते झाले अंगण, कारण दारावर लटकत होते एक मोठे कुलूप... तू गाव सोडून गेलेली, हे आत्ताच कळले मला. क्षणार्धात हातातली फुले आपसूक सांडली, आणि पांगून त्यांनी अंगणभर रांगोळी मांडली. झेलत माझ्या आसवांचे तप्त मोती, ती ताजी फुले एका क्षणात निर्माल्य झाली... छे! फुले नव्हतीच ती गळून पडलेली, कोमेजून गेलेली... प्रीतीच होती माझी!

Read next